सगळीकडे प्रश्न भरून राहिलेत
गावात नेट येत नाही
झाडावर चढून अंदाज घेतायेत चांगल्या नेटवर्कचा
पोर खोळंबून राहिलीयत
परीक्षा, प्रवेश, शिकणे, आणि मोकळा श्वास
वसतिगृहे ओस पडलीयेत
विषाणू घुसून राहिलाय सगळीकडे
बंद वर्गाकडे नजर घुसवून
सताठ पोरांच्या ऑनलाईन हजेरीत
पोरांचं भविष्य शोधतोय उद्यासाठी मास्तर
अढकळलेल्या नेटच्या प्रतिक्षेत
ओपन केलेली प्रवेशाची लिंक कोरडी पडलेय पैश्यावाचून
पूर्ण करता करता बापाचा अर्धपोटी लोकडॉउन
उभा ठाकतोय समोर
सगळीकडे बंद दरवाजे जगण्याचे
झूम यूट्यूब मीट सगळे हात पसरून बसूनही
कुठेही स्थिर नसणारे शिक्षण
आणि सभोतलाचा शैक्षणिक गोंधळ
दुकान बंद पडल्याने
बाप चितागत झालाय
कोठेही काम करायची तयारी असूनही
पोट भरता येत नाही
कष्टाची तयारी असूनही
हात मोकळेच पडलेत
या विषाणूच्या आगमनाने
आयुष्याची पडझड चालुय
हरवत चाललेली माणसातील
माणुसकी आणखी गढद झालीय
घरात कामावर शेजारी अवतीभोवती,
आपल्याच माणसापासून बाजूला धावणारी व्यवस्था
आणखी जोराने मूळ धरू लागलीय
जगण्याच्या गदारोळात कष्टकरी
हरवत चाललाय आपल्याच जगण्याची ऊब
एक विषाणू आणि त्याआधारे होणाऱ्या
माणुसकीच्या होळी
माणसाला माणसाने असल्या काळात जे करायला हवे
ते पहानेच होतेय दूर
समोर मात्र माणसाची समाजाची आणि पोटाची
लुटालूट सर्रास