सोशल मिडीया वाचक व अभिरुची


मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. हे लक्षात घेतले तरच वाचन संस्कृती वाढावयास मदत होईल. टीव्हीचा वाढता प्रभाव, सोशल मीडिया साइट्स, इंटरनेट, या माध्यमामुळे तरुणाईबद्दल वाचनाविषयी फारच काळजीचे वातावरण आहे. आता तर इंटरनेटचा वापर मोबाइलसारख्या सोप्या माध्यमाद्वारे करू लागले आहेत. इंटेरनेटच्या पाठीवरून आलेल्या व त्यांनी दिलेल्या व्यक्त व्हायची संधीतून सोशल नेटवर्किंग वाढत गेले. जगाच्या कानाकोपऱ्यातील मंडळी एकमेकांशी संवाद साधू लागली. वेगवेगळ्या आवडी, छंद आणि इतर औत्सुकतेच्या विषयांनुरूप हे ग्रुप,गट वाढत जात आहेत.
तंत्रज्ञानाची क्रांती
एकविसाव्या शतकात जन्मलेल्या जवळपास प्रत्येकाला मोबाइल तंत्रज्ञानासोबत इंटरनेट उपलब्ध असणे ही फारच क्रांतिकारक सोय निर्माण झाली आहे. प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः महाभारतातील संजयाइतका पारंगत होत आहे. “इंटरनेट आणि ‘ई-बुक’ यांनी आज वाचनालयांची जागा घेतलेली दिसते. विविध विषयांमधील पुस्तके ऑनलाईन साईट्समुळे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा किंडलवर वाचते. या वाचकांची संख्या वाढलेली दिसते.”१ सर्व मोबाईल धारक या नव्या सोशल मिडीयाचा वापर करताना दिसतो. या माध्यमातून अनेक लोकांचे विचार मते केलेल्या कॉमेंट याचे वाचन करताना दिसतो. पुस्तकातील वाचनाची जागा हळूहळू माध्यमातील सोशल साईट घेतात की काय असे चिन्ह आसपास दिसते आहे. या माध्यमावर लिहिणारे हे विविध स्तरांतले व्यक्ती आहेत. लेखेकच या माध्यमावर लिहिणारे असतीलच असे नसून लहानापासून मोठ्याव्यक्ती फेसबुक, व्हॉट्सअॅप माध्यमात लिहताना दिसतात. या माध्यमात दादही थेट व लगेच मिळते. अट्टल वाचणारे मात्र मुद्रित पुस्तके वाचणे सोडत नाहीत. आजच्या तरुणाईला अनुवाद वाचायला आवडतात. त्यातून मराठी माध्यमातून शिकलेल्या पिढीला इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी अनुवाद म्हणजे जगाची उघडलेली खिडकी वाटते. माध्यमातून लेखक वैचारिक, चटपटीत, सोपे लिहितात, ते तरुणाईला आवडते. सोशल मीडियामुळे समाजातले बरेच भेद नष्ट झाले. हे सपाटीकरण लेखनाच्या बाबतीत आनंददाई आहे.
या पिढीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक संवाद साधने उपलब्ध झाली आहेत. माध्यमे बदलली, तरी ही पिढी वाचत आहे. त्या त्या काळातील माध्यमावर तरुण स्वार होत असतात. आजच्या आयटीमधील तरुणांना फँटसीची ओढ आहे. कविता, कथा, वैचारिक, सामाजिक प्रश्न व अनुवादित साहित्याकडेही त्यांचा कल दिसून येतो. अनेक तरुण धाडसाने आपले म्हणणे मांडताना दिसतात. या लेखणात जोरकसपणा दिसून येतो. आजची पिढी सकस लिहिते आणि तेच तिचे सामर्थ्य आहे. त्यांची भाषा संकरीत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील व व्यवसायातील अनेक लिहिते साहित्यिक नेटवर वाचत वाचतच त्यांचा परिचय होऊन ओळख वाढते. हे सर्वजण लक्षणीय अनेक फॉर्म्समध्ये लिहीत आहेत. एकूणच साहित्याची त्यांची जाण प्रगल्भ आहे.
फेसबुकवरील वाचक व लेखक
फेसबुक कवितांसाठीही एक उत्कृष्ट व्यासपीठ झाले आहे लेखक, प्राध्यापक, इंजिनियर, अशा अनेक साहित्याची आवड असणाऱ्या लोकांचे साहित्य परिचय समाजिक प्रश्न, चालू घडामोडी फेसबुकच्या माध्यमातून लिहताना दिसतात.फेसबुकच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कवितांचे लेखन व त्या संबंधी कवितेचे आस्वादन ही होताना दिसते. कवी अजय कांडर, प्रवीण बांदेकर, बाळासाहेब लबडे, पांडुरंग सुतार, विनोद कुलकर्णी, लवकुमार मुळे, भाऊसाहेब मिस्त्री, डि.के. शेख, सुनील पाटील, रेणुका खोत, ऐश्वर्य पाटेकर, संतोष पद्माकर, अशोक कोतवाल, हरीभाऊ हिरडे, खलील मौमीन,सुशील शिंदे अशा अनेक दर्जेदार कवींच्या कविता फेसबुकच्या माध्यमातून वाचक वाचताना दितात. व या कविताना भरभरून दाद देताना दिसतात या सोबतच या कवितेतील भल्या बुऱ्या गोष्टींची चर्चाही होताना दिसते. याबरोबरच कादंबरी क्षेत्रातील नामवंत “आनंद विंगकर, कविता महाजन , प्रवीण बांदेकर, रंगनाथ पठारे, मकरंद साठे, राजन खान, कैलास दौंड, बाबुराव मुसळे, ऋषिकेश गुप्ते, संजय भास्कर जोशी, वर्जेश सोळंकी, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, प्रमोद कोपर्डे, लक्ष्मीकांत देशमुख, अरुण शेवते, किशोर पाठक, राजीव तांबे, यशवंत मनोहर, श्रीकांत देशमुख”६ अशा कादंबरीच्या जाणकारांची ही वैचारिक देवान-घेवाण फेसबुकच्या माध्यमातून होत असते.
अशा या कादंबरीकारांच्या सोबतच सतीश वाघमारे, अरुण शिंदे, पृथ्वीराज तौर, सतीश तांबे, बालाजी सुतार, सतीश वाघमारे , तारा भवाळकर, देवानंद सोनटक्के इत्यादी लेखक फेसबूकच्या माध्यमातून आपले वैचारिक लेखन करताना दिसतात. यासोबतच चं. प्र. देशपांडे, हिमांशू स्मार्त, मकरंद साठे असे आजच्या पिढीतील नाटककार आपली मते फेसबुकच्या माध्यमातून मांडताना दिसतात. या सोबतच अमोल उदगीकर,समीर गायकवाड,किरण माने आपली चित्रपट समीक्षा करताना दिसतात. या सर्व साहित्यीकाच्या मतांचा या विचारासी सहमत असहमत असाही विचार होताना दिसतो.
व्हाटसॲपवरील वाचक व लेखक
व्हाटसॲप वरील समूहामुळे, अनेक प्रकारच्या गटांची, ग्रुपची निर्मिती झाली आहे. शिक्षक, वकील, इंजिनिअर, कामगार, उद्योजक, दुकानदार, अश्या विविध प्रांतातील लोकांनी व्हाटसॲप ग्रुप गट तयार केले गेले आहेत. वाचनाच्या अंगाने त्याकडे पहिले तर यावरील काही ग्रुपचे सोडले तर काही निर्माण झालेल्या ग्रुपवर अभ्यास-चिंतनपूर्ण लेखनाचा परिचय होताना दिसतो. “अभिरुची, मराठी प्राध्यापक, शिविम, सा.फु. मराठी विभाग”५ अश्या अनेक ग्रुप मध्ये साहित्यविषयक नव्या जुन्या साहित्याचा गंभीरपणे विचार होताना दिसतात.
कविता, कथा, ललित, अश्या समान अभिरुचीच्या लोकांनी एकत्र येऊन व्हाटसॲप माध्यमातून ग्रुपची स्थापनाही केली गेलेली दिसते. पृथ्वीराज तौर, रणधीर शिंदे, अरुण शिंदे, नंदकुमार मोरे, प्रभाकर देसाई, उदय रोटे, गजानन अपीने, प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या समकालीन महत्वाचे लिहिते लेखक स्तंभ-ब्लॉग-वर लिहिताना दिसतात. तर बाळासाहेब लबडे, सुनील पाटील, संतोष पद्माकर, खलील मौमीन यासारख्या कवी लेखकाकडून प्रचलित आणि त्यांनी स्वत:च जुन्या व नवीनही लिहिलेली विचारप्रवण कविता व्हाटसॲप ग्रुपवर वाचायला मिळते आहे. व वाचक त्याना दाद देताना दिसतात. अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने चालवलेल्या या-ग्रूपमध्ये अनेक थीम्स घेऊन गंभीर साहित्यिक चर्चा होत असतात त्यांमध्ये जाणकार वाचक सहभागी होताना दिसतात.
या साहित्यिक वाचनात खूप लोकांची यादी करता येईल. माझ्या आवतीभोवतीची ग्रुपवरील व फेसबुक वरील इतकी नावं आलीत. कित्येक राहिली ही. यातले कोण कुठे ,कोण कुठे. देशभरात, जगभरात. सोशल मीडियाने भावविश्व आणि साहित्यविश्वही आज व्यापलेलं आहे. यातून कवितेला किती नव्या मिती मिळाल्या, किती विचारांचं आदानप्रदान होत आहे. हे प्रश्नही समोर येतात. कधी वैचारिक शीणही येतो. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी जिज्ञासू वाचक सोशल मिडीयाचा वापर वा नव्या सकस लिहणाऱ्या लेखकाना आपल्याशी जोडून घेताना दिसतात व या जोडून घेण्यातून वाचनाची भूक व जीज्ञासा भागवताना दिसतात.
“संस्कृती (राजेंद्र थोरात), साहित्य आणि समाज (प्रशांत देशमुख), माय मराठी (शे. दे. पसारकर), बालमित्र (प्रशांत गौतम), , काव्यचावडी (भगवान निळे, कल्पेश महाजन, योगिनी राऊळ), साहित्य संगिती (कपूर वासनिक), झिमाड (वृषाली विनायक), खान्देश साहित्य मंच(नामदेव कोळी), टीका आणि टीकाकार (गणेश मोहिते), सत्यशोधक (वंदना महाजन), अक्षरवाङ्मय (नानासाहेब सूर्यवंशी), पुरोगामी (हनुमान बोबडे, गजानन वाघ), जय साहित्य प्रतिष्ठान(जय घाटनांद्रेकर), शब्दसह्याद्री (बाळू बुधवंत)”२ अशा निखळ वाङ्मयीन गटातून साहित्यिक वाचणाची आवड निर्माण करत आहेत.
या माध्यमाबरोबर इंटरनेटवर ई मासिके मिळणेही सुलभ झाले आहे.विविध सीमकार्ड कपन्यांनी आपल्या ॲपव्दारे मासिके वाचनासाठी उपलब्ध केली आहेत. जिओ, ॲपवर हजारो मासिके उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साधना, अनुभव, किशोर अशी दर्जेदार मासिकेही वाचक वाचताना दिसतात. मराठी साहित्य प्रेमींसाठी सद्यकाळात ई संमेलन ही ठीक ठिकाणी होताना दिसतात. युनिक फिचर ने आत्तापर्यंत ४ते५ ई संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाना वाचकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळताना दिसतो.
डिजिटल माध्यमे व वाचक अभिरुची
लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय होय. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. ई-बुक ही वाचनातील सहज साध्य व हवे ते पुस्तक तत्काळ मिळवून देणारे महत्वाचे माध्यम होय. जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेत आहेत. छापील माध्यमांचा डिजिटल माध्यमांच्या दिशेने प्रवास सुरू आहे. येणारे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे काळानुसार बदलणाऱ्या या वाचन माध्यमांना आपण स्वीकारताना दिसतो. आपल्या वेळेनुसार वाचक सद्या आपल्याला हवे ते पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र, नियतकालिक डाउनलोड वा तत्काळ वाचताना दिसतो. लेखकांपर्यंत पोहोचणे, संपर्क साधणे आता अधिक जलदसोपं झालं आहे. लेखक वाचक ह्यांच्यात होणाऱ्या संवादातून लेखक वाचक परस्परांतले अंतर सूक्ष्म झाले आहे.
हे सर्व वाचनाचे प्रयोग पाहतां आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो. समाजमाध्यमांनी काय केले? तर केवळ प्रकाशन माध्यमाचीच नव्हे तर अभिव्यक्तीची दारे सर्व जनांना खुली केली आहेत. नवोदित लेखकांचा वाचकांशी संपर्क होतो. लेखक आणि वाचकाचं नातं जुळून येते. त्या दोघांनाही लिखाणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबाबत चौकश्या नसतात. काही घेणेदेणे नसते. मात्र लिखाण वाचल्यावर त्याशी आपलं जग किती जवळून जोडल्यासारखं वाटते. कवी लेखकांची संख्या फेसबुक, व्हाटसॲप आणि इतर समाजमाध्यमांमुळे वाढली आहे.डॉ. पृथ्वीराज तौर व्हॉट्सअॅप साहित्य समेलन अध्यक्षपदी भाषणात म्हणतात “समाजमाध्यम आज नवे लेखक घडवत आहे आणि त्याचवेळी हे लेखक समाजमाध्यमांची आचारसंहिताही घडवत जात आहेत. स्वतःला विकसित करणे, जाणीवा समृद्ध करणे, समानधर्मी मित्र मिळवणे, आपल्या लेखनासाठी अपेक्षित स्पेस आणि वाचक निवडणे अशा अनेक गोष्टी समाजमाध्यमांमुळे शक्य झाल्या आहेत. समाजमाध्यमांनी जगाची दारे खुली केली आहेत.”३ व्हाटसॲप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमातील आपले लेखन अगदी असेच आहे. सदसदविवेकाचा वापर करुनच ते झाले पाहिजे, कारण त्यावरुनच तुमचे मुल्यमापन होणार आहे.
समारोप
असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे दोन व्यक्तींमधल्या संवादातील सहजता वाढविण्यासाठी तयार झालेले माहिती तंत्रज्ञान ह्या पिढीचे भान वाढविते आहे. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. हे लक्षात घेता तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियांवर वृत्तपत्रातील लिखाण जेवढी खळबळ माजवतं तेवढी पुस्तकातील लिखाण माजवताना आढळत नाही. या मुळे ई –बुक आणि सोशल मीडियावर दमदार अभिव्यक्तीचे कोंब फुटताना दिसत आहेत लिहित्या लेखकांनी ही माध्यमे आपलीशी केली आहेत.

संदर्भ यादी
१.भारतातील प्रसारमाध्यमे काळ आणि आज,अनुवाद जयमती दळवी, डायमंड पब्लिकेशन पुणे प्रथमावृत्ती २००८.पृ १३६.
२.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर
३.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर
४.फेसबुक, मला जोडून असणाऱ्या व्यक्ती व मी फोलो करत असणाऱ्या व्यक्ती.
५.व्हाटसॲप, मला जोडून असणारे ग्रुप

One thought on “सोशल मिडीया वाचक व अभिरुची

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s