कोकणातील लोककला : जाखडी नृत्य

लोकोस्तव म्हणजे लोकसंस्कृतीला श्रीमंत करणारा विधी होय . हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. कोकण परिसरात ही खूप मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे केले जातात. कोकणाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. सारा कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाबरोबरच लोककला या इथल्या जगण्याचा स्थायीभाव बनलेला आहे. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत, सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलं. सह्याद्रीची जंगले, अभयारण्ये, नदया, धबधबे, नितांत सुंदर बॅकवॉटर्स, रुपेरी समुद्र किनारे, आंबा-काजू, नारळ, फोकळीच्या बागा, पुरातन मंदिरे, किल्ले, दुर्ग, हजारो वर्षापुर्वीची संस्कृती, समृध्द ग्रामजीवन लोककला या साऱ्यांनी कोकण बहरला आहे.
कोकणात भजन,शिमग्यातील खेळे, गणपतीतील जाखडी नृत्य, बैठकीचे गाणे, डफावरचे गाणे, अशा अनेक लोककला पाहायला मिळतात. त्यामुळे कोकणातील सण उत्सवांमध्ये एक वेगळीच लोकसंस्कृती पाहावयास मिळते. कोकणातील या कला व उत्सव येथील लोकांना परमेश्वराचे चिंतन व मनोरंजनाची ही महत्वाची साधने आहेत . त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी होय. या धार्मिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचा वारसा अव्याहतपणे त्यांनी सुरू ठेवला आहे. लोकांचे मनोरंजन हा ही या कलेमागील उद्देश असतो. या कलेच्या सादरीकरणामुळे समाजात आनंद व उत्सव पसरलेला असतो. ही परंपरा कोकणी माणसाने जोपासली आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालावा यासाठी अनेक शाहीर, भजन सम्राट, बुवा, कवि प्रयत्नशील आहेत.
कोकणातील एक लोकप्रिय कलाप्रकार म्हणजे जाखडी नृत्य होय. हा कलाप्रकार सर्वांचे निखळ मनोरंजन करतो.सोबतच परमेश्वर चिंतनही घडवतो. जाखडी नृत्य हे ‘नागेशवळी’ यांच्या पंथातून जन्मास आली. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. जाखडीचा नाच हा उभ्‍याने केला जातो, म्‍हणून त्‍यास ‘जाखडी’ असे म्‍हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’ मध्‍ये नृत्‍य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्‍हटले जाते. मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्‍या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्‍या अथवा जाखडी नृत्‍यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जाखडी नृत्यास लोकप्रियता मिळत आहे जाखडीला ‘बाल्या’, ‘जाखडणे’ किंवा ‘तंभुली नृत्य’ असेही म्हंटले जाते.यामध्ये शाहिरांमध्ये ज्याप्रकारे सवाल जवाब होत असतात त्याचप्रकारे जाखडीत सुध्दा दोन्ही बुवांचे सवाल जवाब होतात. या सवाल जवाब करणार्‍या दोन्ही शाहीरांना शक्ति-तुरा या नावांनी ओळखले जाते. शक्ती-तूरा म्हणजे शंकर-पार्वती व राधा- कृष्ण यांचा संवाद असतो. बुवा म्हणजे शाहीर. नृत्य’ या कलाप्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात.. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्‍याचा सामना असेही म्हणतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्‍हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्‍याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला. पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या डफ-शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे ‘बाल्या नृत्य’. बुवा जाखडी नृत्याच्या माध्यामातून प्रबोधन व निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
जाखडी नृत्य हे पूर्वीच्या काळापासून अस्तीवात आसणारा नृत्य प्रकार आहे . पूर्वी प्रत्येक गावाची एक जाखडी नृत्य असे स्वरूप होते. त्यावेळी गावातील स्त्री वगळता सर्वजण जाखडीत नाचत. याउलट चालू काळात जाखडी ही एका गावात तीन ते चार ठिकाणी सादर केली जाते.
गणेशोत्‍सवाच्‍या काळात जाखडी नृत्‍य व परंपरेला मोलाचे स्‍थान आहे. गणेशोत्‍सवात जाखडी पथके वाड्यावाड्यांतून बाल्‍या नृत्‍य सादर करताना दिसतात. चिपळूण तालुक्‍यातील अनारी, कुंभार्ली, पिंपळी, टेरव, कामथे, सावडे, गांग्रई, आंबडस अशा गावांतून जाखडी पथके आढळतात. राजापूर तालुक्यात मंडणगड, शिळ , उन्हाळे महाळुंगे , काशिर्गे व गुहागर, रोहा , दापोली, पडवन, खेड, संग्मेश्वर अशा अनेक गावात हि जाखडी पथके जाखडीचे सादरीकरण करताना दिसतात. हि जाखडी पथके नृत्‍य सादर करताना, शाहीर नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्‍यांवर गीते रचतात. नृत्‍याच्‍या वेळी गीते गायली जातात. राधाकृष्‍णावर विशेष करून गाणी रचली जातात. वासुदेवाची गाणी, अथवा भारूडासारख्‍या लोकप्रकारांतून केली जाणारी जनजागृती जाखडी नृत्‍यातील गीतांतही दिसून येते. जाखडी नृत्‍यातील गीतांमध्‍ये ‘गणा धाव रे…’हे गीत विशेष प्रसिद्ध आहे.पूर्वीच्या काळात या खेळामध्ये प्रामुख्याने नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई , खुळखुळा, बासरी, टाळ, तबला, टिमकी, सुंदरी चकवी, बुलबुला संगीत वाजविण्यासाठी अशा प्रकारची पारंपारिक वाद्ये पूर्वीच्या काळी वापरली जात असे. बदलत्या काळानुसार आणखी काही नवीन इलेक्ट्रोनिक साहित्याचा वापर यामध्ये होवू लागला. ती म्हणजे कॅशिओ, ऑरगन ,पॅड, आणि प्रभावी ध्वनीसाठी विविध प्रकारचे माईक्स. जो केंद्रस्थानी गीत गाणारा (बुवा) असतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे माईक्स दिले जातात. त्याचबरोबर स्वर मिक्सरचा वापर केला जातो. आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी आवाज उपकरणांचा उपयोग केला जातो. बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात.
पूर्वीच्या काळी जाखडीत नाचण्यासाठी वीस ते पंचवीस लोकांचा समावेश असायचा त्यांचा पोशाख हाफ चड्डी किंवा शर्ट एवढाच असायचा आणि मध्यस्थानी एक साधा विजेचा दिवा असयाचा परंतु कालानुरूप यामध्ये बदल होत गेले बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्‍यासोबत डोक्‍यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्‍याची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात.आणि सध्य स्थितीत जाखडीच्या पोशाखात बदल झाला आहे. तो खूप आकर्षक असा वापरला जातो. पायात घुंगुर, डोक्यात पगडा, हाताच्या मधल्या बोटाला मापक असा झगमगीत रुमाल बांधला जातो. चेहरा विशिष्ट प्रकारे सजवला जातो किंवा मुले किंवा मुली देव देवतांची किंवा राजा महाराजांची वेशभूषा करतात. तसेच प्रकाश योजनेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वापरल्या जातात. लहान दिव्यांच्या लाईट्स, पोक्स, किंवा डिंमर,कलर, हॉलिजन यांचा प्रकाश ढोलकीच्या व नाचणार्‍या मुलांच्या अंगावर मारले जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरण रंगीबेरंगी होवून जाते.
पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त पुरुषच (२५ वर्षा पुढील ) गायन करत असे. सध्या मात्र यामध्ये बदल करून वयाची अट न ठेवता लहान मुले व महिलांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. जाखडी गायनाची कला अतिशय प्राभावी असते. जाखडीचे सादरीकरण करताना प्रथम शक्तीवाले त्यांचे नृत्य सादर करतात. त्यामध्ये ईशस्तवन केले जाते. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यानंतर गण-गौळण, सवाल-जवाब, साकी, प्रतिस्पर्ध्याच्या चुका काढणारे, भक्तीपर, सामाजिक अथवा सद्यस्थितीसंबंधी माहितीपर गाणी गाऊन त्यावर नृत्य सादर केले जाते. गणात गणपतीला वंदन केले जाते, तर गौळणीत कृष्णाने गौळणींना केलेला इशारा गायला जातो. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. तुरेवाले त्यांचा सवाल विचारतात व शक्तीवाले त्यांच्या काव्यातून त्यांना उत्तर देतात.जाखडीमध्ये सुरुवात करताना जे गीत गायले जाते. त्या गीताला ‘गण’ असे म्हटले जाते. ‘ शिवतनया वक्रतुंड गौरीच्या रे बालका’ अशा गणपतीच्या गीताने ज्याप्रमाणे इतर शुभ कार्यक्रमाची सुरुवात होते अगदी तशीच सुरुवात जाखडीची होत असल्याने ती आद्य दैवत गणपतीच्या नामस्मरणाने होते.
जाखडीचा ‘डबलबारी’ हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक शाहीर शक्तीवाला तर एक तुरेवाला असतो. पूर्वी यापैकी जो अगोदर उपस्थित राहत त्याला बारी अगोदर करण्याची संधी दिली जात. सध्या मात्र शक्तीवाला शाहीर असतो त्यालाच आपली बारी सादर करण्याची संधि दिली जाते. डबलबारीसाठी जे गाणारे दोन्ही शाहीर असतात. या दोघांचे (कलगी, शक्ति, तुरा )ओळखपत्र असणे गरजेचे असते.ओळखपत्र नसेल तर त्यांना या खेळात सहभागी होता येत नाही. काळानुरूप तिचे स्वरूप बदलत गेले. यामध्ये शक्तिवाले बुवा पहिले आपले नृत्य किंवा गीत सादर करतात. तर दुसर्‍यावेळी तुरेवाले बुवा आपला कार्यक्रम सादर करतात. असे दोन वेळा होते. शक्तीवाले बुवा तुरेवाल्या बुवांना शास्त्राधारे प्रश्न विचारतात व तुरेवाले उत्तर देतात.
जेव्हा जाखडी सुरू होते तेव्हा शक्तीवाले शाहीर असतात ते स्वत:ची बारी सुरू करतात. जेव्हा सुत्रसंचलन करतात तेव्हा लेखी प्रश्नांची प्रत प्रतिस्पर्धी शाहिरांना देतात.ज्यावर प्रश्न व शाहिराची सही आणि नाव असते. तद नंतर पहिली तीन गाणी होतात ती म्हणजे गण, गौळण, पद अशा प्रकारची असतात. त्यापुढे जे प्रश्न असतात ते सर्वांसाठी म्हणजेच प्रेक्षकांना ही प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारण्याची पध्दत अशी असते.
प्रश्न :१. कला पथकाचे नाव काय.?, शाहीरचे नाव काय.? प्रेक्षकाकडुन प्रश्न आले असलयास प्रश्न व प्रश्न विचारणार्‍याचे नाव आणि सही असते. तसेच प्रश्न कोणत्या शाहिराला विचारला आहे याची टिप्पणीही असते. या प्रश्नांचे उत्तर ग्रंथाच्या आधारे असते.
बाल्या नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. जोडचाल, एक पावली, दोन पावली, तीन पावली आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते. नृत्‍य करणा-यांना बाल्‍या असे संबोधतात. उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात. नृत्‍याची रचना प्रामुख्‍याने वर्तुळाकार असते. नृत्‍य करताना घुंगरू बाधलेल्‍या पायाने ठेका दिल्‍यामुळे ढोलकी, झांजरी, टाळेच्‍या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो. पायातले घुंगरू, गायकाचा उत्‍साहपूर्ण आवाज यामुळे नाचणा-यांच्‍या अंगी उत्‍साह संचारतो आणि ते गीत-वाद्यांच्‍या तालावर आरोळया देऊ लागतात. गाण्‍याच्‍या मधे ऐकू येणा-या त्‍या आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो. मात्र पायात घुंगरू बांधून नाच करणारे दुर्मीळ आहेत.
यामध्येच वेगवेगळ्या गाण्याच्या तालावर मुले मुली नाचतात. पाऊले मारतात, कोडी सोडवतात, रथ करतात. अशा प्रकारे हे नृत्य सादर केले जाते. डबलबारी या जा खडीच्या प्रकारात शक्तीवाला – तुरेवाला- शक्तीवाला – तुरेवाला अशा प्रकारे क्रमाक्रमाने एकमेकांना प्रश्नोत्तरे केली जातात. दोन्ही शाहीर जे एकमेकांना प्रश्न विचारतात ते पुराण रामायण, महाभारत, अशा पौराणिक ग्रंथातले असतात. यामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबर ज्ञानात भर हे प्रश्न घालत असतात. आणि प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात दोन्ही बुवांचे वाचन होत असते. या खेळातून मनोरंजनाबरोबर ज्ञान संपादनाचे कामही उत्कृष्टरित्या केले जाते. बाला नृत्यात गोफ नृत्याचाही समावेश आहे. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. नाचणा-या बाल्‍यांचा वेशही कृष्‍णाप्रमाणे डोक्‍यावर मुकुट, दंड आणि मनगटावर बाजुबंद, गळ्यात माळा असा असतो.
गोफ नृत्‍याचे दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्‌’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी साधर्म्य आढळते.
गोफ नृत्‍यप्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्‍या नृत्‍यासोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्‍यासाठी नर्तकांची संख्‍या समप्रमाणात असावी लागते. चार, सहा, आठ अशा संख्‍येने त्यांच्‍या जोड्या असतात. गोफ रंगेबेरंगी साड्या, ओढण्‍या अथवा कपड्यांपासून तयार केला जातो. नृत्‍य सादर करण्‍याच्‍या जागी, नर्तकांच्‍या शिरोभागी आढ्याच्‍या केंद्रस्‍थानी गोफ बांधून त्‍याची अनेक (नृत्‍य करणा-या व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येएवढी) टोके अधांतरी सोडलेली असतात. प्रत्‍येक बाल्‍या एकेक टोक हाती घेतो. त्यानंतर गाण्‍याच्‍या तालावर आणि ढोलकीच्‍या ठेक्‍यावर नृत्‍य सुरू होते. काही वेळातच, बाल्‍या नृत्‍याची वर्तुळाकार गती सोडून परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्‍यांची नृत्‍याची पद्धत नागमोडी (झिगझॅग) वळणाची असते. अर्ध्‍या जोड्या डाव्‍या तर उर्वरित जोड्या उजव्‍या बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्‍याची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्‍या ठेक्‍यावरील पदन्‍यास, परस्‍परांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्‍या एका पदन्‍यासामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्‍प्‍यावर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्‍या उत्‍साहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्‍याची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्‍यानंतर गोफ सोडवण्‍याचा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्‍या विरूद्ध दिशेने परस्‍परांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.
काही विभागांत विशिष्ट असे मनोरे उभारले जातात. रत्‍नागिरीमध्ये अड्डेरवाले हरी विठ्ठल नावाचे प्रसिद्ध शाहीर होऊन गेले. त्यांची जाखडी नाचाच्या कथेवरील पुस्तकेही प्रसिद्ध होती. पूर्वी केवळ कोकणात असणारे हे नृत्य शहरातही पाहण्याची संधी मिळते. ते नृत्य कोकणी माणसाबरोबर महाराष्ट्रातील सर्व भागांतील लोकांच्या पसंतीस पडले आहे.
शक्ति तुर्‍याच्या सामन्यात जी गीत गायली जातात ती ज्ञान देणारी असतात. गायलेल्या गीतांना चाल चित्रपटातील प्रसिध्द गीतांच्यावर आधारित असते. त्यामुळे प्रेक्षक आवडीने ऐकतात. जरी चाल चित्रपटाची असली तरी त्यातून दिली जाणारी माहिती ही पौराणिक ग्रंथातील असते.या खेळामध्ये सादर केली जाणारी गीते: पहिल्या बारीत तोडा म्हणजेच चित्रपट गीताच्या चालीवर गीत सादर करणे, स्तवन- प्रार्थना, गण-देवाचे नामस्मरन, गवळण- प्रेक्षकांना चिडवणे, राधा कृष्णाचे संवाद, प्रश्न, पद- शक्तीवाले आपल्या गीतातून सादर करतात ते गीत, तर दुसर्‍या बारीत टोमणा यात श्रेष्टत्वावरून लढाई चालते, समाजप्रबोधन गीत, उदा. मुलगा- मुलगी एक समान, सामाजिक गीत अशा प्रकारच्या गीतांचा समावेश केला जातो.त्यामध्ये गण-देवाचे नामस्मरन गणपतीच्या गीतांनी केली जाते त्यामध्येगणरायाची किर्ति माझ्या, जगाला आली दिसून
उंदरावर यावे बसून बाप्पा तुम्ही, तुम्ही उंदरावर यावे बसून
किंवा
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्य त्र्यंबके गौरी, नारायने नमोस्तुते
अशा गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. तर या गीतानंतर बुवांच्या सवाल जवाबाची जुगलबंधी सुरू होते. राधा कृष्णाच्या नात्यातील वास्तव प्रेक्षकांसमोर गाण्यातून ठेवले जाते.
प्रीत तुझी अन माझी गं, राधे सार्‍या जगाला आली कळून
किंवा
मी गं श्रीहरी, वाढलो नंदाघरी खेळलो नानापरी,
होवू नको गं, राधा बावरी,तू होवू नको बावरी
राधाचे श्रीकृष्णावरचे प्रेम, लळा होता, पण आपले नाते पूर्ण होणार नाही हे ही गीतातूनच बुवा सांगतात.
प्रित तुझी न माझी आगळी गं राधे,
होणार नाही पुरी, गं राधे होणार नाही पुरी
अशा गीतातून दोन्ही बुवा एकाच बाजूचे दोन पैलू मांडताना दिसतात. कधीकधी या कार्यक्रमातून देशभक्तांना , शहिदांना श्रध्दांजली वाहिली जाते. तर एखाद्या प्रेक्षकांना गीत किंवा सवाल, जवाब आवडल्यास बुवांना बक्षिसे दिली जातात. जाखडीत प्रश्न किंवा सवाल जवाब होतात ते असे.
बुवाचा प्रश्न.दुर्गा देवीने दुर्गासुराला मारण्यासाठी जे दोन बाण मारले त्यातून नरौत्पत्ती झाली त्याची नावं काय. ? हा प्रश्न बुवा शाहिराला गाण्यातून विचारतो आणि गाण्यातूनच शाहीर त्याचे उत्तर देतो.
उत्तर : शाहीर म्हणतो तुझे वाचन आहे कमी, असा पुरावा पुराणात नाही दिला.
यानंतर शाहीर प्रश्न विचारतो व तुरेवाला बुवा उत्तर देतो.असे अनेक प्रश्नोत्तरे होतात. प्रश्नांच्या जुगलबंधित मनोरंजनासाठी एखादे चित्रापटातील गीत सादर केले जाते. तर कधी एकमेकांना अज्ञानी म्हणून चिडविले जाते. जाखडीच्या शेवटी गीत म्हटले जाते त्याला ‘गजर’ असे म्हंटले जाते. हे गीत ही देवाच्या नावाचेच असते. अशा प्रकारे कोकणातील लोककलेतील मनोरंजनाची एक कला जाखडी कोकणात सर्वत्र सादर केली जाते.
सध्‍या जाखडी नृत्याचे आधुनिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. नृत्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर वाढला असून नृत्याची परंपरा चुकीच्या मार्गावर नेली जात आहे असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. नृत्‍यामध्‍ये ईश्‍वराचे स्‍मरण आणि भावनिकता यांना स्‍थान होते. त्या जागी जाखडीमध्‍ये सिनेमाच्‍या गाण्‍यांच्‍या तालावर गीते गायली जातात. त्‍याचबरोबर गाण्‍यातून एकमेकांशी अर्वाच्‍य भाषेत बोलणे, अश्‍लील गाणी म्‍हणणे, आकर्षणासाठी नृत्‍यात कसरती करणे, अंगावर विद्युत उपकरणे लावणे, डोंबा-याचे खेळ करत नाचणे, अशा अनेक प्रकारांनी या लोककलेत शिरकाव केला आहे. जाखडी नृत्याच्‍या दृकश्राव्‍य सीडी बाजारात येत आहेत. त्‍यातही चांगल्‍या गीतांसोबत थिल्‍लर स्‍वरूपाची गीते पाहण्‍यास-ऐकण्‍यास मिळत आहेत.
जाखडी लोककलेमधील अश्‍लीलता दूर व्‍हावी आणि या लोककलेचा पूर्वीचा बाज कायम रहावा यासाठी काही संस्‍था प्रयत्‍नशील असल्‍याचे दिसते. चिपळूण तालुक्‍यात रत्‍नाकर दळवी यांच्‍याकडून दरवर्षी जाखडी नृत्‍याच्‍या स्‍पर्धा भरवण्‍यात येतात.यामध्ये शक्तीवाले वृन्दाली दळवी, मंडणगड, संतोष कणेरे उन्हाळे, कविता निकम खेड, संदेश दुदम संगमेश्वर , तेजल पवार साखरपा , कृष्ण नागरेकर, शिळ, सत्यवान कार्शिगकर, कार्शिंगे तर तुरेवाले शाहीर वसंत भोयर चिपळूण, रामचंद्र गांकर पडवन, देवेंद्र झिमण लांजा, प्रभाकर चोळकर दापोली या सारखे अनेक शाहीर (बुवा ) या स्पर्धेत सहभागी होतात. या सारख्या स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातात. या स्‍पर्धांना प्रतिसाद मिळत असून, स्‍पर्धा जिंकणे हे जाखडी नृत्‍य मंडळांच्‍या दृष्‍टीने मानाचे समजले जाते. कोकणात अशा काही स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येते.
सद्या गणेशोत्‍सवात जाखडी नृत्‍याचा प्रभाव कमी झाला असल्‍याचे निरीक्षण वर्तमानपत्रांतून नोंदवण्‍यात आले आहे. हल्ली जाखडीत अश्लीलता आलेली दिसते. जाखडीचे निवेदन करत असताना दोन्ही बुवांच्या तोंडातून अनेक अश्लील शब्द , ओंगाळवाणे चित्रण होताना दिसते. जाखडीच्या उगमापासून आतापर्यंत तिच्या सादरीकरणात काळानुसार जाखडी नृत्त्यात बदल होत गेला असूनही इतर कलांप्रमाणे कोकणात ही कला आजही जोपासली जाते. या कलेद्वारे समाजप्रबोधनाचे व मनोरंजनाचे उत्कृष्ट कार्य होताना दिसत आहे. प्रा. बाळासो सुतार
आबासाहेब मराठे महाविद्यालय
राजापूर
मो ९७३०८९१४२८
इमेल bala.sutar@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s