गावागाड्याचा बदलता अवकाश

खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण या खाऊजा च्या परिणामाने जगाबरोबरच भारतातही खूप उलथापालथ झालेली दिसून येते. पारंपरिक स्वरुपाची कुटुंब आणि गावपद्धती एकदम कालबाह्य ठरली. खरेदी विक्रीच्या ऑनलाइन पद्धती या आमच्या जगण्याचा आविभाज्य भाग झाल्या आहेत खाण्यापिण्याचे, मनोरंजन आणि अन्य स्वरूपाचे सारे रीतीरीवाजही बदलले. तंत्रज्ञान वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता इंटरनेट, मोबाईल वापरू लागली. गुगल, युट्यूब आणि एकूणच इंटरनेट हे माहितीची आणि ज्ञानाची नवी माध्यमे आपल्या हातात आली. सीसीटीव्ही, मोबाईल कॅमेरा आणि या स्वरूपाच्या अन्य साधनांनी कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. यातून संपत जाणारी ‘प्रायव्हसी’ खरेच या अर्थाने आता आपण ग्लोबल व्हिलेजचे गावकरी झालो आहोत. जगायच्या नव्या पद्धती अंगी बानवून शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटलेले दिसतात.
काळाच्या स्थित्यंतराचे बिनचूक आकलन असलेले व समकालीन काळाचे सहप्रवासी बालाजी सुतार कवी-लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नियतकालिकांतून मोजक्या परंतु अभिजात अशा कथा लिहून कथाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यांच्या कथा-कवितांचा ‘गावकथा’ हा रंगाविष्कारही गावाची वास्तव मांडणी करतो आहे. त्यांचा‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा आठ कथांचा पहिलाच कथासंग्रह आजच्या मराठी कथेला नवे वळण देण्याची क्षमता बाळगून असलेला समृध्द करणारा आणि समकालीन कथा संग्रह आहे. एकंदरित बालाजी सुतार हे आजच्या लिहित्या लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव आहे . त्यांच्या या आजच्या कथेबद्दल राजन गवस यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्यानुसार लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश करून देणाऱ्या आजच्या कथाकारांमध्ये बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’. ‘१९९० ते २०१५ या पावशतकास’ ही कथासंग्रहाची अपर्णपत्रिका बरीच बोलकी, आणि सूचक आहे. नव्वद नंतरचा काळ हा आपल्या देशातल्या एका नव्या पर्वाच्या आरंभाचा आहे. या कथासंग्रहात ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’, ‘डहूळ डोहातले भोवरे’, ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’, ‘दोन जगातला कवी’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’, ‘संधिकाळातले जहरी प्रहर’ आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ अशा एकूण सात कथा १५९ पानांमध्ये व्यापलेल्या आहेत. या आठ कथा अतिशय वेगवेगळे विषय कौशल्यानं हाताळणार्‍या आणि तरीही एका धाग्यात बांधता येतील अशा, माणसांचं आजचं आयुष्य व बदलत्या काळातील बदलती नाती या समकाळाच्या कसोटीवर तपासणार्‍या आहेत. या कथासंग्रहाला मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘कथाकार शांताराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे, ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा शब्द पब्लिकेशने या वर्षी प्रकाशित झालेला संग्रह. याच वर्षी त्याची दुसरी आवृत्ती निघाली ही बाब खास नोंद घ्यावी अशी होय. या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत.
जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यावर खेडेगावांमध्ये जीवनमान कसे बदलत गेले, तिथली जातीव्यवस्था कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे. शतकानुशतके काबाडकष्टातच जगणारी महिला, साभोवतालची व्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे. जाती-पातींच्या आड माणूस म्हणून दडलेले राक्षसी चेहरे, तरुणाईची स्वप्ने कोणती आहेत. ती कशाने भंगत आहेत. गावांमध्ये धार्मिक तेढ म्हणजे नेमके काय असते, अशा विविध धागादोऱ्यांचा अतिशय बळकट पोत बालाजी सुतार यांची लेखणी अतिशय मर्मभेदी पद्धतीने विणते.
गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावागाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. कृषी संस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड व बदलता गावागाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरीत्या बालाजी सुतार आविष्कृत करताना दिसतात. बदलत्या गावागाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. समकालीन शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात पसरते आहे. शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती असताना ही कथा नव्या भवतालाकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी देते. लोकमानसामध्ये घडलेल्या पालटामुले कृषी संस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला गेलेले तडे व उपयोगितावादी, व्यवहारी, जीवनदृष्टी या बदलाचे व त्यातील ताणाचे चित्रण बालाजी सुतारांची कथा करते.
‘विछिन्न भोवतालाचे संदर्भ’ ही पहिलीच कथा ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन हे शहर आहे की, स्मशान ? असा प्रश्न विचारत जगण्यात बैचेन झालेल्या माणसांच्या व्यथांचे खंडित, तुटलेले वास्तव मांडते. राघव नावाच्या एका तरुणाची शब्दांत टिपलेली आत्मसंवेदना आहे. राघवला बिनकामाचा निवांतपणा आहे आणि त्या निवांतपणाचे काय करायचं हा प्रश्न पड्तो. राघव रोजच्या आयुष्यात काही अर्थ शोधू पाहतो. एका कम्प्युटर सेंटरवर नोकरी करणारा, फारसं काही न घडणारं आयुष्य, त्यातली काही माणसांच्या आतल्या दु:खाशी आपलं दु:ख उगीचच ताडून पाहणारा. समकाळाविषयी भाष्य करणारी ही कथा आहे. “सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्याचे काय करावे, हे त्याला उमगत नाही हीच त्याची गोची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर लेखक लिहितात, ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले. जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या. सव्यापसव्यं यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते, हे भडव्या कधी उमजणार तुलाॽ पारा उडून आणि गंध विरून गेल्यावरॽ’. या दोन प्रसंगांमध्ये त्यांचा हा सवाल प्रत्येक शब्दांवर अनेक अंतरंगे उलगडत वचकाला थक्क करून टाकतो. पुढे ते आणखी एका संदर्भात म्हणतात, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशानॽ’, ‘मायेचा पाऊस असला तर माणसाच्या शिवारात ओल राहते. पाऊस नाही, धान मरून जातं. पाऊस नाही, मन जळून जातं. पाऊस नाही, तहानेनं वाळून जा. पाऊस ओढ देतो, चातक होऊन बस. पाऊस झड लावतो, अगस्ती होऊन उपस. पावसात रोमँटिक कविता लिहिणं ठीक आहे. पावसात खमंग भजी तळून खाणंही ठीकच. पावसा अभावी काही पिकं, काही शेतं, काही घरं, काही गावं आणि कितीएक शंकर मरून जातात हे लक्षात असू दे.’ असे चिरफारळलेला, भेगाळलेला भवतालाचे चित्र उभे करतात तेव्हा वाचकाच्या काळजाचा थरकाप उडतो. समकाळाच्या माणसाच्या जगण्यातील संदर्भांचा मागोवा घेते, जगण्यातले ताणे-बाणे, विछिन्न भोवतालाचे संदर्भ कथा उदगोचर करते.
‘डहूळ डोहातले भोवरे’ ही कथा हरिश्चंद्र शेकाटेच्या मनातील डहूळला डोहातील पडलेल्या प्रश्नांची गुंतवळ या कथेत उमटवून जाते. मानसिक-शारिरिक गुलामीच्या बळी ठरलेल्या, अडलेल्याचा फायदा घेणार्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रवृत्तीचा ही कथा वेध घेणारी आहे. नवऱ्याच्या कर्जबाजारीपणाच्या विळख्यामुळे सावकाराची लैगिंक शिकार आपल्याला व्हावं लागेल, या जाणिवेने शांतरामच्या मेव्हणीने रोगर पिऊन केलेली आत्महत्या, या बाईच्या आत्महत्येनंतर हरिश्चंद्र आपलं हतबल आयुष्य तपासून पाहतो. व आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहे याचे भान त्याला येते. “राख झाल्या चितेचे तपशील शोधण्यात नंतर काय हशील होतं?” हा प्रश्न सतावत असताना तो आपल्या परीनं एक उपाय काढू पाहतो. दुसरीकडे हरिश्चंद्र शेकाटे या नायकाच्या पत्नीला, नवरा कामावर गेला की ज्याच्यामुळे त्याला नोकरी लागली, त्या मामेभावासोबत संग करायला भाग पाडणारी हतबलता, असा मूल्यात्मक संघर्ष या कथेत शांताराम, व्यंकटी या पात्रांच्या व सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर -पुरुष नातेसंबंधांच्या घुसमटीचा एकसमयावेच्छेदक आढावा ही कथा घेते. स्त्री-पुरुषांच्या भावभावना, कामप्रेरणा, त्यातून निर्माण होणारे ताण, त्यात होरपळणाऱ्या जीवांची घालमेल व घुसमट ‘डहूळ डोहातले भोवरे’ ही कथा दर्शवते.
‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाउन्स’ या कथेतून कवी, लेखक किंवा प्रतिभावंत असणारी समाजमान्य-राजमान्य माणसं समाजमाध्यमांवर वेगळी व त्याच माध्यमाच्या इनबॉक्समध्ये अत्यंत वेगळी वागतात. प्रकारच्या अदृश्य जगाचा अनुभव व्यक्त झाला आहे. जगाशी जोडून घेता येण्यासाठी आज बहुसंख्य लोक समाजमाध्यमांवर वावरत असतात, त्यामुळे त्यांना आपली भूमिका आपली ओळख निर्माण करता आली, हे जरी खरं असलं तरी, त्या समाजमाध्यमांची दुसरी बाजू ही अत्यंत वेगळी नि विरुद्ध म्हणावी अशी आहे. या आभासी जगाने आपल्याला व्यक्त होण्याचा अतिआत्मविश्वास दिला, तसाच व्यक्तिगत जगण्यावर हल्लाही केला आहे. अनेक कुटुंबं उध्वस्त केली आहेत. आपल्या विवेकाला, मूल्यांना हादरा दिला आहे, हे विसरून चालणार नाही. हे चित्र लेखक’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाउन्स’ या कथेतूनचित्रित करतो. चित्रा, सर्जेराव,मोहन या पात्राआधारे माध्यमातील सध्यकालीन तरुण तरुनींची अवस्था ते चित्रित करतात. सोशल मीडिया, त्यातलं आभासी जग आणि तिथली फसवी-तात्पुरती नाती वस्तुस्थितीचे दर्शन ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ही कथा करते. जग तांत्रिकदृष्ट्या कितीही विस्तारले, सामाजिक समतेचे अवकाश जरी मोकळे झाले असले तरी“स्रीचं जीवशास्रीय ‘मादी’असणं आणि पुरूषातला‘नर’उफाळून येणं”या स्री-पुरूष आदिम हा विषय अलीकडे अनेक कथाकारांना खुणावत असतो. त्यातला फोलपणा ते आपल्या पद्धतीनं शोधत असतात. त्या प्रकारची संग्रहातली कथा ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’. कम्प्युटरच्या निळसर चमकदार पडद्यामागचं जग निवेदिकेच्या आयुष्यात एक हलचल माजवून जाते. थोड्या काळापुरती. स्त्री-पुरुष नात्यांचा आदिम अर्थ कायम तोच असतो का, याचा निर्देश त्यात आहे. पण एक सर्वसामान्य स्त्री हेही शांतपणे पचवून पुढे जाते, हे विशेष लक्षात घेण्यासारखं.
‘दोन जगातला कवी’ ही कथा एका कवीच्या साहित्य आणि वास्तवाच्या चटकयांचाही निर्देश ही कथा करते. एका संवेदनशील कवीचं जग या कथेतून आलेलं आहे. कवीचं गाव, गावातील कृषिवल लोकसमूह, त्यांची लहरी निसर्गावर आधारित जीवनपद्धती, त्यावर उमटलेले जागतिकीकरणाचे तीव्र पडसाद, आतबट्यात आलेली शेती आणि तरीही त्यांचे विलक्षण रागलोभ, तसेच त्या समूहातील भाव-भावकीत असणारे वैमनस्य व त्यातून एकमेकांचे नुकसान करणारी विकृत मानसिकता, ह्या सर्वांचे चित्रण या कथेत चित्रित होते. साहित्यिक आणि शेती अशा दोन्ही जगात वावरणार्या व्यक्तीच्या मानसिक संघर्षाचे सत्यान्वयी दर्शन‘ दोन जगातला कवी’ या कथेतून घडते. लेखक, कवी हे काही समाजातील अविभाज्य भाग आहेत. समाजात वावरताना घडणाऱ्या अनेक घटना-घटितांचा ते आपल्या साहित्यातून वेध घेतात. एक प्रतिमासृष्टी ते निर्माण करून आपल्या सूक्ष्म दृष्टीने ते समष्टीकडे पाहतात. अशाच कविच्या जगण्यातील तारेवरील कसरत व त्याचा भोवताल लेखक या कथेत चित्रित करतात
‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून शिक्षित, पण अडाणी बेरोजगारांची आणि त्यानं निर्माण केलेले उच्चशिक्षितांचे चमत्कारिक प्रश्न ही कथा उजागर करते. ग्रामीण-शहरी जीवनरीतीतील ताण आणि खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्था,तीमधील संस्थाचालकांची सरंजामी वर्तवणूक ,त्यात अनुदानाच्या अपेक्षेने गुलामासारखी राबणारी तरूणाई,त्यात त्यांचे हुरूळून गेलेले भौतिक-अभौतिक स्वप्ने-ईच्छा-आकांक्षा यासह आजच्या तरूणाच्या जैविक-अजैविक पराभवाचा नकाशा साकारतो. जागतिकीकरणाच्या नंतर शिक्षणाला आलेले बाजारू स्वरूप, शैक्षणिक संस्थाचे संचालकांना आलेले संस्थानिक-सरंजामदारी स्वरूप, शिक्षण संस्थांचे फुटलेले पेव, शिक्षणक्षेत्रातला बजबजाट, उद्धवस्त झालेली गुणवत्ता,उद्ध्वस्त झालेली बेरोजगार पीढ़ी व त्यांचे आजचं वास्तव, ही कथा चित्रित करते. पैशांचं साधन बनलेल्या शिक्षणसंस्था आणि स्पर्धा परीक्षा केंद्रं हे धर्म, जातीयता, पैसा, सत्तेच्या अमर्याद वापराखाली भरडले जात कसल्याही कामाला जुंपलेले शिक्षक-प्राध्यापक, स्त्री-पुरुष संबंधांमध्ये एकीकडे येत चाललेला मोकळेपणा, पण दुसरीकडे न टाळता येणारं गावकुसातलं पारंपरिक आयुष्य अशा पार्श्वभूमीवर निवेदकाची पराभूत आणि भ्रमनिरास झालेली स्थिती विलक्षण विदारकतेनं ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून समोरं येतं. तालुका किंवा निमशहरी पातळीवर शिकून चांगली नोकरी करून कुटुंबाला वर काढण्याच्या उद्देशानं कष्ट करून घेतलेलं शिक्षण आणि त्याची प्रत्यक्षातली किंमत हे प्रखरप्रखर वास्तव बालाजी सुतार कथेत मुखर करतात
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा मागील पंचवीस वर्षातील स्थित्यंतरात्मक घटीतांना मुखरीत करते. समाज जेवढा अनागोंदीचा, तेवढा लेखकांसाठी विषयांचा, आशयांचा पुरवठा मुबलक. मराठी समाज सर्वच बाबींत एवढय़ा प्रमाणात भंगलेला आहे की, लेखकांना लिहिण्याच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक व आवाहनात्मक आहे. हिंदू-मुस्लिम संघर्षातून निर्माण झालेला धार्मिक उन्माद, पाणी आणि मूल्यहीन राजकारणाने घडवलेला भवताल, शेतकर्यांच्या आत्महत्येचा तीव्र बनत गेलेला प्रश्न, आरक्षणातून निर्माण झालेले पेच अशा या काळाला भारीत करणार्या मराठी समाज आजच्या मराठी लेखकांना विषय पुरवण्याच्या दृष्टीने अत्त्युच्च टोकावर आहे. आज आपण अधिकच आधुनिक झालो आहोत, पण आपल्यातला धर्म-जात-वंश यांचा वृथा अभिमान काही केल्या आपल्याला सोडता वा टाळता आलेला नाही. उलट आपण त्याला खूपच चिकटून बसलो. आपल्या अस्मिता अधिकच टोकदार करत गेलो. गेल्या पंचवीस वर्षांतील आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय अवस्थांतराचा हा वेधच ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेतून बालाजी सुतार यांनी खूप सशक्तपणे घेतलेला आहे एकीकडे सामाजिक प्रश्नांचा गुंता वाढत असतानाच पर्यावरचा ऱ्हास व पाण्याच्या वैश्विक प्रश्नावरही खूप मर्मभेदक भाष्य त्यांनी केले आहे. आपल्या एकूण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवरचे त्यांचे चिंतनशील भाष्य त्यांनी या कथांतून फार परखडपणे मांडले आहे. १९९२च्या दंगली. त्यात बिलालचा संदर्भ. मग पुढे २००८मध्ये पाण्याच्या प्रश्नावरचं राजकारण आणि गावपातळीवरचं समाजकारण. नंतर २०१३मध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागचं अर्थकारण, आणि २०१७मधली हलवून टाकणारी टिपणं. रूढार्थानं कथा नसलेल्या या नोंदी एका संवेदनशील मनानं टिपलेल्या आहेत. जागतिकीकरणाने, जगण्याच्या स्पर्धेने गावांचे, शहरांचे बदललेले रूप बालाजी सुतार पोटतिड्कीने मांडताना दिसतात.
वर्तमानाचे अध:पतित वास्तव म्हणून ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’ ही कथा उजागर होते. या कथेत तालुक्याचा गाव आहे. त्यात जातीय तेड आहे. तिथल्या करीमनगर वस्तीतली अनुबाई ही उद्योगी स्त्री करीमभाईच्या पोरग्याला धरून आहे. दारिद्रयाच्या हतबलतेतून स्रीने धनाढ्याशी अनैतिक शरिरसंबंध ठेवत मुकाट्याने आपला संसाराचा गाडा हाकत राहणे, राजकीय डावपेचाच भाग म्हणून वरचड ठरू पाहणार्याचा खून होणे, त्याच्या आरोपात गरीबाला गोवले जाणे,त्यातून हिंदू-मुस्लीम असा अस्मितावादी राजकारणाचा खेळ खेळत समूहा-समूहात वैरभाव निर्माण करत स्वत:चा स्वार्थ साधणे या वृत्तीचे संवेदन या कथेतून चित्रित होते. कथेला वस्तीतल्या अनेक गोष्टींचे पदर आहेत. या पोराचा मृत्यूनंतर आणि तिच्या निष्क्रिय नवर्‍याच्या मृत्यूनंतर वस्तीपलीकडील जगाची व पुरुषाची नजर ओळखून राहणारी अनुबाई पुन्हा पुन्हा त्याच नजरेच्या परिघात येत राहते. नगरपरिषदेच्या अभद्र राजकारणामुळे शहरात वसणार्या अनाधिकृत झोपडपट्या, त्यातील बकालपण,’संधिकाळातले जहरी प्रसंग’ही या संग्रहातील शेवटची कथा दिवसेंदिवस जगणे निस्तेज होऊन नासत चालल्याची जाणीव प्रभावीरित्या व्यक्त झाली आहे.
खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती-प्रवृत्ती, राजकारणाने घेतलेले नवे वळण, गावाचे ढासळतेपण, तरुणांची बदलेली मानसिकता, स्त्रियांच्या जगण्यातील गुंतागुंत, नात्यात निर्माण झालेले ताण, जातीच्या टोकाचा अभिमानाचे, अहंकाराचे तीक्ष्ण झालेले कंगोरे या कथेच्या केंद्रभागी आहे. एकीकडे सामाजिक प्रश्नांचा गुंता वाढत असतानाच समस्यात भरडून निघणाऱ्या व्यक्तींच्या मनाची आंदोलने अत्यंत बारकाव्याने लेखकाने दृष्य व प्रत्ययकारी केली आहेत. भिन्न भिन्न व्यक्तिमत्त्वांतील परस्परांना छेदणारे विरोधी भावदर्शन आणि प्रसंगदर्शन यामुळे समस्यांची तीव्रता घुसत जाते. पर्यावरचा ऱ्हास व पाण्याच्या वैश्विक प्रश्नावरही खूप मर्मभेदक भाष्य बलजी सुतार करतात. आपल्या एकूण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवरचे त्यांचे चिंतनशील भाष्य नागर व अनागर अशा दोन्ही समाजजीवनातील, बदलांचा, त्यांच्या सुरूप-कुरूप वृत्ती-प्रवृत्तीचा खूप विस्तृत व व्यापक आढावा त्यांनी या कथांतून फार परखडपणे घेतला आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण, अनुभवांची व्यामिश्रता, काय सांगायचे याचे आणि कथात्मकतेला असणारा ठाम निर्धार, त्यामुळे नव्या कथात्म-साहित्याची सुरुवात या कथासंग्रहात दिसून येतो.
या कथासंग्रहाची भाषाशैली व मराठी कथेतील या कथेचे स्थान सांगताना “आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर” या लेखात केदार काळवणे लिहितात “आजच्या विदीर्ण जगाच्या जीवनरहाटीचा भोवंडून टाकणारा मूल्यात्मक आशय आणि आशयाच्या तीव्र दाबातून साकारलेला चिरेबंद भाषिक रूपबंध हा या कथेचा मूलभूत विशेष आहे.कथागाभा विशद करणारी प्रतिकात्म कथाशीर्षके,आशयार्थाचे सरळ सूचन करणारी कथासुरूवात आणि कथारचितात रिकाम्या जागा ठेवत वाचकांना तपशील भरायला लावणारे अस्वस्थकारी कथाशेवट,विचारसंपृक्त सुविचारमय निवेदनपध्दती, शब्द-वाक्यांची काटेकोर रेखीव बांधणी,कथारचनेची प्रयोगशील परंतु अर्थसंगत कुतूहलपर मांडणी, चित्रात्मक-फोटोग्राफीक कथनशैली, कथा जोडणीत काव्य-संवाद व उपरोधाचा साधलेला अटीव मिश्रसंयोग,ढबदार मराठवाडी हिंदी-मराठी बोलभाषा आणि प्रमाणभाषेचे सफाईदार उपयोजन, छोटे-छोटे प्रसंगतुकडे आणि घटना समूहांची घट्ट वीण या सार्यांच्या सप्रमाण एकतेतून या कथाघाटाची बांधणी झालेली आहे.हा रूपबंधाचा ढाचा रूढ मराठी लघुकथेचा साचा मोडत नव्या कथनमार्गाची पायवाट निर्मिणारा आहे.” या संग्रहातील आठ कथामधून निवेदनाच्या बाबतीत कथेच्या आशयाला धक्का लागू न देता प्रयोगशीलता केली गेली आहे. पाच कथा प्रथमपुरुषी निवेदनातून साकारलेल्या असून उर्वरित तीन कथा या तृतीयपुरुषी निवेदनात आहेत. कथांच्या अनेकपदरी अवकाशातून समाजव्यवस्थेचे तळकोपरे ते या निवेदनातून मुखर करतात. कथांमधील वर्णनात्मक शैली, निवेदन, संवाद, बोलीभाषा व तिचा प्रादेशिक बाज यांचा त्यांनी कल्पकतेने वापर केला आहे. लोकपरंपरेने चालत आलेली संस्कृतिक रुपतत्त्वे त्यांच्या लेखनात आढळतात.
शिकलेल्या तरुणांची शिक्षण, नोकरी, पैसा प्राप्त करण्याची प्रवृत्ती व धडपड, गावाचे होत असलेले शहरीकरण या ज्वलंत समस्यावर ते परखडपने बोलतात. भौतिक बदलांमुळे नागर अनागर रचनेतील सत्तासंबंधापासून ते मानवी मानसिक रचनेपर्यंतचे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, बदल कसे घडत गेले हे त्यांनी संवेदनक्षम मनाने टिपलेले आहे. कथेच्या प्रभावी जाणीवविश्वाबरोबरच कलात्मक रुपाला स्वायत्त स्थान देणारी कथारुपे बालाजी सुतार यांच्या लिखाणातून प्रकटतात व वाचकांना समृद्ध करतात.संदर्भ टीपा
१ बालाजी सुतार, ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’,शब्द प्रकाशन, प्रथमावृती २०१९.
२ केदार काळवणे, ‘आपलं महानगर’, आजच्या विछिन्न अर्धनागर जगाची बखर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s